पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा समारोप नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला होणार आहे. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असून ११ डिसेंबरला कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली आहे.
संजोग वाघेरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. कर्जमाफी फसली आहे. शेतक-यांना कर्जाचे पैसे अजून मिळाले नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हेच त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यापर्यंत प्रत्येक समाजघटकाला अहितकारक असे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत. सरकारच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेला विदर्भात शेतक-यांसह सर्वच घटकातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आमचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह आजी-माजी खासदार आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील देखील काही पदाधिकारी हल्लाबोल पदयात्रेत सहभागी झाले आहेत. शेतक-यासह सर्वंच घटकातील नागरिक मोर्चात सहभागी होत आहेत. आपल्या व्यथा पक्षाच्या नेत्यांना सांगत आहेत. त्यांचे प्रश्न समाजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचे नेते करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या मोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये माजी आमदार, महापौर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका सहभागी होणार आहेत अशी माहिती संजोग वाघेरे यांनी दिली.
बैठकीसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष पवक्ते फजल शेख, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, प्रदिप गायकवाड, शुक्रुल्ला पठाण, यतिन पारेख, आनंदा यादव, सी.आर. कांबळे, गंगा धेंडे, विश्रांती पाडाळे, पुष्पा शेळके, कविता खराडे, सविता खराडे, शहजादी सय्यद, मनिषा गटकळ, शकुंतला भाट, सचिन माने, गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, बाळासाहेब जगताप आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.