पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये ‘अमृत योजने’अंतर्गत ३५ लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आज पाणीपुरवठा अधिकार्यांसोबत पाहणी करून टाकी उभारण्याची जागा निश्चित केली आली.
शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाण्याची कमतरता पडू शकते. त्यामुळेच परिसरात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, तसेच पाणीसाठा वाढावा म्हणून येथे पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. ‘अमृत योजने’अंतर्गत ही टाकी बांधण्यात येणार असून जमिनीवर २५ लाख लिटर आणि भूमिगत १० लाख लिटर अशी एकूण ३५ लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
निर्मला कुटे म्हणाल्या की, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, उपअभियंता राजेंद्र जावळे, उद्यान स्थापत्य विभाग अधिकारी संजय कांबळे, नगररचना विभागाचे संतोष जगदाळे आदींसोबत आज टाकी बांधण्याच्या जागेची पाहणी केली. येथील आयसीआयसीआय बँके समोरील उद्यानामध्ये टाकीची जागा निश्चित करण्यात आली.
या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन १५ जानेवारी पर्यंत करण्याचा प्रयत्न असून त्याबाबत संबंधित अधिकार्यांना तशा सुचना दिल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांनी सांगितले.