जास्तीत जास्त पात्र दिव्यांग नागरिकांनी नोंदणी करावी; मतदार नाेंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- निवडणूक आयाेगाच्या सुचनेनुसार यापूर्वी मतदानापासून वंचित राहिलेल्या
दिव्यांग मतदारांसाठी चिंचवडमध्ये उद्या रविवारी (दि.३) राेजी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष माेहिमेचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाचे मतदार नाेंदणी अधिकारी तथा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली आहे. या मोहिमेचा जास्तीत -जास्त दिव्यांग नागरिकांनी लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण माेरे प्रेक्षागृहात सकाळी रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिव्यांग मतदारांसाठी Special Camp for Voters Registration आयोजित केला आहे.
भारत निवडणूक आयाेगामार्फत दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदानापासून वंचित राहिलेल्या दिव्यांग बांधवांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.
हे फाॅर्म भरून द्यावे लागणार..
(फॉर्म नं 6 ) नवीन मतदार नोंदणी करीता
(फॉर्म नं 6A ) परदेशी मतदार म्हणून नोंदणी करीता
(फॉर्म नं 6B) विद्यमान मतदारांव्दारे आधार क्रमांकाची माहिती
(फॉर्म नं 7 ) आक्षेप आणि स्वतः हटवणे
(फॉर्म नं 8 ) दुरुस्ती/ शिफ्टिंग / डुप्लिकेट EPIC तसेच दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करण्यासाठी अर्ज करावेत.
ही कागदपत्रे जाेडावी लागणार..
फॉर्म जमा करताना दिव्यांग प्रमाणपत्र व रहिवाशी पुरावे जोडणे आवश्यक आहे. (फॉर्म नंबर ६ व 8 साठी – रहिवासी पुरावा, पत्याचा पुरावा लाईट बिल/पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित केलेले 10 वी किंवा 12 वी चे प्रमाणपत्र. फॉर्म नंबर 7 साठी नाव वगळावयाचे व्यक्तीचा मृत्यु दाखला, लाईट बिल/पाणी पट्टी, आधारकार्ड, बँक किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार द्यावा लागणार आहे.
शहरातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग नागरिकांनी मतदार नोंदणी अधिकारी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ कार्यालय, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, थेरगाव पुणे व कै. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड या ठिकाणी फॉर्म जमा करावेत. तसेच ज्या दिव्यांग नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य नाही त्यांनी Voters.eci.gov.in व Voter Helpline App वर मतदार नाेंदणीसाठी अर्ज भरावा.– नीलेश देशमुख, मतदार नाेंदणी अधिकारी तथा सहायक आयुक्त.