पिंपरी (Pclive7.com):- संतांचे विचार हाच आपला आधार आहेत, तेच आपल्या जीवनाला आकार देतात. दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अंतर्मुख झाले पाहिजे. संतचरित्र वाचले पाहिजे. आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर संस्कृतीचे धडे दिले पाहिजेत. गुरु आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करतात, तर सद्गुरू जीवनाचा मार्ग दाखवतात. संसार होत असतो. परमार्थ करावा लागतो. अलिकडच्या पिढीने वडीलधाऱ्या मंडळींचा मान ठेवावा. संतवचनाचे संस्कार मनुष्य जीवनाला आकार देतात. असे मत हभप सोपान महाराज सानप यांनी व्यक्त केले. ते विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हेकरवाडी, सायली काॅम्प्लेक्स येथे गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने आयोजित्त दत्तजयंती सोहळ्यात बोलत होते.
कार्यक्रमास पिंपरी चिंचवड भाजपा अध्यक्ष शंकर जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, प्रेरणा बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, मंंडळाचे अध्यक्ष चंद्रहास वाल्हेकर, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, अक्कलकोटचे सरपंच रमेश पाटील, संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक तानाजी भोंडवे, मंडळाचे आधारस्तंभ राजाराम वाल्हेकर, ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रविण वाल्हेकर, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, गणेश भोंडवे, संगीता भोंडवे, शेखर चिंचवडे, आतिश वाल्हेकर, अमोल वाल्हेकर, प्रशांत वाल्हेकर, शुभम वाल्हेकर, तुषार वाल्हेकर, मिलिंद वाल्हेकर आदि मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कोंडीबा शिवले व राजाराम वाल्हेकर यांच्या हस्ते दत्तप्रभुंची आरती संपन्न झाली.
मंडळाचे अध्यक्ष चंद्रहास वाल्हेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सुप्रसिद्ध गायक तुषार केळकर आणि सहकाऱ्यांनी संतवाणी सादर केली. वारकरी ,दत्तभक्त, महिला, आबालवृद्ध यांनी हरिपाठ, दिंडी सोहळा, कीर्तनसेवा यात सहभाग घेतला. परिसरातील भजनी मंडळींनी सादर केलेल्या भजनमालिकेने वातावरण भक्तिमय झाले होते. प्रविण वाल्हेकर यांनी आभार मानले. हभप रामलिंग मोहिते, अर्जुन जाधव, शिवाजी हरकळ, उद्धव कोळपकर, सुनील काळे यांनी विशेष सहकार्य केले.