पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याच्या चालू असलेल्या चुकीच्या कामासंदर्भात आज वाकड परिसरातील २७ सोसायटींचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची आयुक्त दालनात भेट घेतली.
यावेळी सोसायटी प्रतिनिधींनी चालू असलेल्या दत्त मंदिर रस्त्याच्या कामाबद्दल अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली. वाकड परिसराची वाढती रहदारी, चालू असलेले अनेक गृहप्रकल्प, अनेक मॉल व दुकाने यामुळे हा रस्ता अत्यंत तोडका होणार आहे. त्यातच ४५ मीटर नुसार मान्यता असून देखील महापालिका दुजाभाव करीत आहे. तसेच ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांना खुद्द महापालिकाच अभय देत आहे. त्यामुळे हा रस्ता ४५ मीटर नुसारच व्हावा हीच मुख्य भूमिका सर्व सोसायटीधारक, पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन यांनी घेतली.
यावर आयुक्त शेखर सिंह म्हणाले कि, येत्या आठवड्यात सर्व अतिक्रमण केलेल्या मालमत्तांना नोटीस पाठवून तीव्र कारवाई केली जाणार आहे. तसेच हा रस्ता ४५ मीटर नुसार करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
यावेळी नंदन इंस्पेरा, कोस्टा रिका, गणेश इम्पेरिया, ओमेगा पॅरॅडाईस, सिल्वर स्कायस्कॅप, कॅलिस्टो, ब्लिस, ईडन टॉवर, पॅराडायसो, पेटल्स, अक्षय हाईट्स, रिद्धी सिद्धी, मॉन्ट वर्ट ऑईस्टरा, मॉन्ट वर्ट सिव्हिल, मॉन्ट वर्ट विवांता, मॉन्ट वर्ट वन, आश्रय, सुमित्रा व्हॅली, ओरीयाना, अपोस्ट्रॉफी, कॅप्रिसिओ, कॅपिटल टॉवर, यश वन, बेल्ला विस्टा आदी सोसायटींचे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते.