पिंपरी (Pclive7.com):- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एकाकडून बँक खात्यावर वेळोवेळी २० लाख ६० हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १२ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पिंपळे सौदागर येथे घडला.
या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन कंपन्या, कंपनी प्रतिनिधी विनोद कावले, प्रोफेसर अर्जुन कपूर आणि मीना पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी विनोद याच्यासोबत सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात शेअर मार्केटबद्दल बोलणे झाले. त्यानंतर विनोद याने अर्जुन कपूर आणि मीना पटेल यांच्याशी फिर्यादी यांची ओळख करून दिली. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटबद्दल माहिती सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता विविध कारणांसाठी आणखी रक्कम घेत त्यांची २० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.