पिंपरी (Pclive7.com):- बेशिस्त वाहनचालक तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शनिवारी (दि.३०) धडक कारवाई केली. वाकड येथील फिनिक्स मॉल परिसरात व थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यात ४०६ वाहनांवर कारवाई करून चार लाख ३७ लाखांचा दंड आकारला गेला. त्यात शहरातील ‘गोल्डनमॅन’ म्हणून ओळख असलेल्या वाहनचालकाच्या वाहनावरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
वाकड येथील फिनिक्स मॉल परिसरात दिवसभरात ३०५ वाहनांवर दोन लाख ५०० रुपये दंड आकारला. चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा केलेल्या कारवाईत ५०० रुपये दंड आकारला. त्यानंतरही काळ्या काचा आढळून आल्यास संबंधित वाहनावर १,५०० रुपये दंड आकारण्यात येतो. यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पदमजी पेपर मिल समोर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या ४७ वाहनांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड आकारला गेला. अन्य परिसरातही पोलिसांनी दंड वसूल केला.
‘गोल्डन गाईज’ची काळी फिल्म हटवली..
‘गोल्डन गाईज’ म्हणून शहरात महागडी आलिशान चारचाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकालाही वाहतूक पोलिसांनी दणका दिला. संबंधित वाहनचालकाने त्याच्या या चारचाकी वाहनाला सोन्याची पॉलिश केले असल्याचे सांगण्यात येते तसेच ‘गोल्डनमॅन’ म्हणून संबंधित वाहनधारकाची ओळख आहे. त्याच्या या ‘गोल्डन’ चारचाकीत हाय प्रोफाइल व्यक्ती तसेच सेलिब्रिटी नेहमीच दिसून येतात तसेच ही गोल्डन चारचाकी शहरात कुठेही दिसल्यास बघ्यांची गर्दी होते.