पिंपरी (Pclive7.com):- तीन वर्षांपासून आपले वास्तव्य बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीवर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. विलास बाळशीराम मोरे (वय ३८, रा. दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी विलास मोरे फरार होता. पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मागील तीन वर्षांपासून आरोपी विकास मोरे वास्तव्य बदलून राहात होता. त्यामुळे तो पोलिसांना मिळून येत नसे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार बाळू कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रूपनवर यांनी तांत्रिक विश्लेषण करून विकास मोरे याचा ठावठिकाणा शोधला. तो फुगे प्रायमा बिल्डिंग, भोसरी येथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी विलास मोरे याच्यावर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, अंमलदार बाळू कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळू कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.