पिंपरी (Pclive7.com):- गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाइल क्रमांक अपलोड करून ऑनलाइन खंडणी मागणाऱ्या कोलकाता येथील टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटरवर छापा टाकून ते चालविणाऱ्या सहा जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ४ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सूरजकुमार जगदीश सिंग (वय २७), नवीनकुमार महेश राम (२३), सागर महेंद्र राम (२३), मुरली हिरालाल केवट (२४), अमरकुमार राजेंद्र राम (१९), घिरनकुमार राजकुमार पांडे (२५, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल, मूळ- झारखंड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ स्मार्ट मोबाइल, ७ व्हाइसचेंज मोबाइल्स, ४० सीमकार्ड, १४ पेमेंट डेबिट कार्ड, ८ आधार कार्ड, पॅनकार्ड, ८ नोटबुक, असा ४ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, १५ मे रोजी किरण नामदेव दातीर (३५, रा. डुडूळगाव) यांनी ऑनलाइन पैसे मागितल्याच्या कारणावरून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचा मावस भाऊ सौरभ शरद वीरकर यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयित सूरजकुमार व त्याच्या साथीदारांनी किरण यांच्या मोबाइलवर संपर्क करून त्यांचा व्हॉट्सॲपचा डीपी काढून त्यांच्या फोटोची छेडछाड केली. त्यांचा फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून किरण यांना वारंवार कॉल करून पैसे मागितले. संशयितांनी १२ हजार रुपये बँक खात्यावर घेऊन पुन्हा वेगवेगळ्या फोनवरून कॉल करून त्यांना ब्लॅकमेल केले. त्यांच्याकडे ५१ लाख रुपये मागितले. पैसे दिले नाहीत, तर सर्व फोटो गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीपोटी किरण यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. संशयित नगेर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता येथील फ्लॅटमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, फ्लॅटवर छापा टाकून संशयितांना जेरबंद केले. दिघीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, संतोष पाटील, नितीन अंभोरे, सुनील भदाणे, किशोर कांबळे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अशा प्रकारे जाळ्यात अडकवत..
अटक संशयित नवीन सीमकार्ड विकत घेऊन जी-मेलवर बनावट नावाने खाते तयार करत असत. त्याआधारे गुगलवर वेगवेगळ्या शहरांतील कॉलगर्लच्या नावाने मोबाइल क्रमांक अपलोड करत असत. त्यावर फोन आल्यावर कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वतःच्या खात्यावर पैसे स्वीकारून पीडितांचा मोबाइल नंबर घेत असत. त्याच्यासोबत आय-किल कंपनीच्या व्हाइसचेंज मोबाइलद्वारे महिलेच्या आवाजात बोलणी करत. त्यावरून पीडितांच्या मोबाइल क्रमांकाद्वारे त्याच्या सोशल मीडियावरून फोटो घेत असत आणि तेच फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉट्सॲपवर पाठवत असत. त्यानंतर त्याला कॉल करून पैशाची मागणी करत. कोणी तक्रार करू नये, म्हणून फक्त ५ ते १० हजार रुपये स्वीकारत असत.