पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता, अतिक्रमणासह विविध विकास कामांचा आढावा आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज घेतला.
आयुक्त कक्षात झालेल्या या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता राजन पाटील, रवींद्र दुधेकर, अय्युबखान पठाण, प्रवीण तुपे, यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
शहरातील स्वच्छतेसाठीची यंत्रणा सक्षम करावी. शहरातील उड्डाणपूल व मुख्य रस्त्यांच्या प्रारंभी कचरा टाकण्यात येतो. तो नियमितपणे उचलून स्वच्छता राखण्यात यावी अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणा-या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व अतिक्रमण विषयक कामकाज सक्षमतेणे करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील हे काम अनधिकृत बांधकाम नियंत्रण व बांधकाम परवानगी विभागाकडे देण्यात यावे अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रत्येक एका किलोमिटर अंतरावर नागरिकांसाठी ई-टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून अथवा महापालिकेकडून ही कार्यवाही करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या. यशवंतराव चव्हाण रूग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरातील इतर दवाखान्यातील ओ.पी.डी. सेवा सक्षम करावी यासाठी नियोजन करावे.
शहरातील सर्व चौकातील लेफ्ट टर्न फ्री केल्यास वाहतूक सुरळीत होईल. त्यासाठी नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यावर योग्य ती कार्यवाही शहर अभियंता व सह शहर अभियंता यांनी करावी अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या. शहरातील रस्त्यावरील बेवारस वाहने पडलेली आहेत. त्यावर कार्यवाही करण्यात यावी असेही आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. त्यावर येत्या 10 दिवसात सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी अशा वाहनांचे सर्व्हेक्षण करून अहवाल द्यावा अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या त्यानंतर पोलीस आयुक्त यांना कळविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
शहरातील व्यायामशाळा, स्विमिंग पूल इत्यादी मधून खेळाडू घडविण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न करण्यात यावेत व त्याची देखभाल योग्य प्रकारे करण्यासाठी नियोजन करावे. शहरातील मनपाच्या शाळा व इमारतीसाठी स्वतंत्र रंग संगती निश्चित करून इमारतींना रंग द्यावेत. नव्याने बांधण्यात येणा-या इमारतींना अथवा मनपा इमारतीची कामे सुरु असणाऱ्या ठिकाणी त्याचा अवलंब करावा. व त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या.