रहाटणी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघासह शहरातील हाउसिंग सोसायट्यां मधील ओला कचरा उचलणार नाही, असा निर्णय महापालिकेने घेतला. यासंदर्भात सोसायट्यांना नोटिसाही बजावल्या. वेळेत कर भरणाऱ्या सोसायटीमधील नागरिकांवर हा अन्याय आहे. सोसायटीमधील ओला कचरा महापालिकेनेच उचलावा. सोसायट्यांना दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी केली आहे. यासंदर्भात चंद्रकांत नखाते यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.
सोसायटीमधील फ्लॅटधारक महापालिकेला नियमित मिळकत कर भरतात. तरी, ओला कचरा उचलण्यास नकार दिला आहे. आरोग्य विभागाने नोटिसा दिल्या आहेत. महापालिकेने अवेळी घेतलेला हा निर्णय अत्यंत गैरसोयीचा आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची अंमलबजावणी करणे नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणार नाही. छोट्या सोसायट्यांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा जिरवण्यासाठी जागेची मर्यादा आहे. महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास ओला कचरा जिरवण्याची व्यवस्था होऊ शकेल असे चंद्रकांत नखाते यांनी म्हटले आहे.
सोसायट्यांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने कचरा जिरवणे तुर्तास शक्य होणार नाही. त्यामुळे ओला कचरा रस्त्याच्या कडेला टाकला गेल्यास रोगराई पसरू शकते. त्यामुळे सोसायटीमधील सुका तसेच ओला कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. गृहप्रकल्प उभारणीस मंजुरी देताना नियमाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते.– चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक.