भोसरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह भोसरीतील मोठा गट बाहेर पडत शरद पवार गटात दाखल झाला. अजित गव्हाणे यांच्या एन्ट्रीमुळे भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत भोसरी मतदारसंघावर दावा केला आहे.
यापूर्वीच्या निवडणुकीत थोड्या मतफरकाने शिवसेनेला हुलकावणी मिळाली आहे. लोकसभेला राष्ट्रवादीच्या खासदाराला आम्ही निवडून आणले आहे. त्यामुळे शिवसेनेवर अन्याय व्हायला नको, यासाठी ‘मातोश्री’वर गाऱ्हाणे मांडणार असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह ३० हून अधिक माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शरद पवार गटात प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या उमेदवारीचे आश्वासन मिळाले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. भोसरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक काल पार पडली. या वेळी पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, अजिंक्य उबाळे, तुषार सहाणे, मीनल यादव आदी उपस्थित होते.
..तर विधानसभेला तुतारीचा प्रचार करायचा नाही..!
महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळाल्यास शिवसेना ‘तुतारी’चा प्रचार करणार नाही, असा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या मतदारसंघात शिवसेना अतिशय कमी फरकाच्या मतांनी मागे पडली होती. आता लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवाराला शिवसेनेने मदत केली. आता ज्यांना पक्षप्रवेश देत उमेदवारीचे आश्वासन दिले जात आहे, त्यांनी लोकसभेवेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला आहे, हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगण्यात येईल, अशीही चर्चा बैठकीत झाली.
भोसरी मतदारसंघावर शिवसेनेचा पारंपरिक दावा आहे. अतिशय कमी फरकाने येथून मी पराभवाचा सामना केला आहे. सध्या शिवसेनेच्या बाजूने पोषक वातावरण असताना या मतदारसंघावरील दावा शिवसेनेने का सोडावा? याबाबत आमचे म्हणणे आम्ही पक्षप्रमुखांसमोर मांडणार आहोत. त्यासाठी आज दि.१८ जुलै रोजी आम्ही मुंबईमध्ये पक्षप्रमुखांची भेट घेणार आहोत. आम्हाला खात्री आहे की, हा मतदारसंघ ‘मशाली’लाच मिळणार आहे.– सुलभा उबाळे, संघटिका, पुणे जिल्हा