पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवडमध्ये जात असल्याने पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिला. महापौरांच्या त्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. आता महापौर पद देखील चिंचवडमध्येच खेचण्यासाठी नगरसेवकांनी कंबर कसली आहे. महापौरपदी शत्रुघ्न काटे यांची वर्णी लागावी यासाठी चिंचवड विधानसभेतील नगरसेवकांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगतापांकडे साकडे घातले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदावरून बर्याच घडामोडी घडल्या. आमदार महेश लांडगे समर्थकांची वर्णी न लागल्यामुळे महापौर नितीन काळजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्षांकडे दिला. हा राजीनामा पक्षाने अद्याप स्विकारला नाही. मात्र आता महापौरपदी शत्रुघ्न काटे यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. चिंचवड विधानसभेतील काटे समर्थक नगरसेवकांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची भेट घेत साकडे घातले आहे. नगरसेवक सुरेश भोईर, चंद्रकांत नखाते, राजेंद्र गावडे, तुषार कामठे, अभिषेक बारणे आदी नगरसेवकांनी जगताप यांना भेटून ही मागणी केली आहे. त्यामुळे आता जगताप नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.