पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज सांगवी परिसरात ‘अच्छे दिन’ची बैलगाडीतून यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सांगवी येथील साई चौकातून सुरू करण्यात आलेली ही यात्रा पिंपळे गुरव येथील डायनासोर पार्क पर्यंत नेण्यात आली. यावेळी शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, शाम जगताप, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, गौरव टण्णू, तानाजी जवळकर, शेखर काटे, प्रतिक साळुंखे, अमोल पाटील, निलेश निकाळजे, सनी ढाळे, कुणाल थोपटे, हर्षवर्धन भोईर, रशिद सय्यद, अलोक गायकवाड तसेच मोठ्या संख्येने तरूण कार्यकर्ते उपस्थित होते. दुचाकी, गँस सिलेंडर, रिकामे हंडे, वडापावचा स्टॉल, कचरा बैलगाडीवर ठेऊन ही यात्रा काढण्यात आली.
यावेळी बोलताना विशाल वाकडकर म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते. खोट्या आश्वासनांच्या गाजराला जनता फसली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. पदवीधर तरूणांना आज रोजगार नाही, प्रचंड बेराेजगारी वाढली आहे. घरगुती गँसचे दर गगनाला भिडले आहेत. शहरात कचर्याचे साम्राज्य वाढले आहे. सत्ताधारी भाजपला त्याचेही नियोजन करता येत नाही. लोकांना पिण्यास मुबलक पाणी मिळत नाही. केंद्रात, राज्यात तसेच महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने सर्वसामान्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. त्याचाच निषेध म्हणून तसेच त्यांनी दिलेल्या खोट्या गाजरांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली.