पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीके चौक अंडरपास निर्माण करावा. स्वराज गार्डन चौक येथील गार्डनचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल उभारण्यात यावा. अश्या विविध मागण्यांचे निवेदन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे देखील उपस्थित होते.
नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस मार्गावरील पीके चौक येथे नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या मार्गावर हिंजवडी, वाकड, पुणे येथे कामानिमित्ताने जाणाऱ्यांसाठी हा सोपा मार्ग असल्याने या मार्गाचा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसेच जवळ असणाऱ्या भोसरी, चाकण, खेड औद्योगिक परिसरातील मोठे मालवाहतूक करणारी वाहने देखील या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे पीके चौक येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते आणि यामुळे आत्ता पर्यंत अनेक छोटे मोठे अपघात या चौकात झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामधून सुटका होण्यासाठी या ठिकाणी अंडरपास, भुयारी मार्ग निर्माण करावा अशी मागणी काटे यांनी केले.
तसेच प्रभाग क्र.२८ रहाटणी सौदागर येथील आरक्षण क्र.३६१ मधील गार्डन वापराचे आरक्षण बदलून त्या जागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल तयार करावा या बद्दलचे पत्र या वेळी दिले. जेणेकरून या उपक्रमाचा फायदा पिंपळे सौदागर येथील २३० हून अधिक निवासी सोसायट्यांना होईल. त्याच बरोबर दिवसेंदिवस महानगरपालिकेतील हॉस्पिटल मध्ये वाढणाऱ्या ICU व NICU बेडची मागणी लक्षात घेता सर्व महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मधील बेडची संख्या वाढवण्यासाठी पत्र दिले जेणेकारीण उत्तम सेवेपासून मुकणाऱ्या आर्थिक दुर्बल व गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येईल. यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नाना काटे यांना दिले.





















Join Our Whatsapp Group