पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घेतला जात आहे. उद्या रविवार दि.२७ रोजी सकाळी ७ वाजता कासारवाडी येथील पवना घाटावर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्विकृत नगरसदस्य कुणाल लांडगे यांनी दिली.
एकेकाळी अत्यंत स्वच्छ असलेल्या पवना नदीची वाढत्या प्रदुषणामुळे अक्षरश: गटारगंगा झाली आहे. शहरातील अनेक भागात या नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मच्छरचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान परिसरात डेंगू, मलेरियासारखे साथीचे आजार देखील पसरत आहेत. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन पवना स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने स्विकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांनी रविवारी दि.२७ रोजी सकाळी ७ वाजता कासारवाडी येथे पवना स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील लांडगे यांनी केले आहे.