पिंपरी (Pclive7.com):- काही वर्षापूर्वी स्वच्छ शहर म्हणून राज्यात प्रथम आणि देशात ९ वा क्रमांक पिंपरी चिंचवडने पटकवला होता. गेल्यावर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत पिंपरी चिंचवड ९ व्या क्रमांकावरून थेट ७२ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यात आता सुधारणा होत यंदाच्या वर्षी शहराने ७२ वरून ४३ व्या क्रमांकावर मजल मारली आहे. वर्षभरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविलेल्या उपक्रमांमुळे ही सुधारणा झाली आहे.
केंद्र सरकारच्यावतीने देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहिर करण्यात आलीयं. यात देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर ने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर राज्यातील दोन शहरेच टॉप टेनमध्ये आहेत. त्यात नवी मुंबईचा ९ वा, तर पुण्याने १० वा क्रमांक मिळवलायं. एकेकाळी स्वच्छ शहर म्हणून ओळखणारे पिंपरी चिंचवड ४३ व्या क्रमांकावर फेकले गेलयं.
फेब्रुवारी २०१६ मध्ये मोठ्या दिमाखात स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्वात क्लीन सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहराला पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर शहरवासियांचा उर अभिमानाने भरून गेला होता. पण पिंपरी चिंचवडकरांचा हा आनंद फार काळ टिकला नव्हता. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत शहराचा नंबर थेट ७२ वर गेला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात प्रशासनाकडून स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शहरात विविध उपक्रम देखील राबविण्यात आले. त्यामुळेच ७२ व्या क्रमांकावरून यंदाच्या वर्षी थेट ४३ व्या क्रमांकापर्यंत पोहचता आले.