पिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी आजपासून सुरू झाली. त्या आदेशानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने आज दिवसभर शहरातील सर्वच भागात धडक कारवाई करण्यात आली. आज दिवसभराच्या कारवाईत तब्बल ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर १६ दुकानदारांवर कारवाई करत ८० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, प्लास्टिक बंदीच्या आत्तापर्यंतच्या कारवाईत ३ लाख ४० हजार रूपयांचा दंड वसूल झाला असल्याची माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी पीसी लाईव्हशी बोलताना दिली.
पिंपरी महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, राज्य सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही प्रशासनाकडून या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. महापालिकेने ८ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आठ पथक तयार केले आहेत. यात पन्नास कर्मचारी तसेच अधिकारी यांचा समावेश आहे. शहरातील सर्वच भागात ही पथके जाऊन दुकाने, हॉटेल्स तसेच इतर आस्थापनांची पाहणी करत आहेत. या पथकांनी आज धडक मोहिम राबवत १६ दुकानदारांवर कडक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण ८० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर आजच्या कारवाईत तब्बल ११५ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त केले आहे. आजच्या कारवाईत ‘अ’ आणि ‘ई’ प्रभागातील कार्यक्षेत्रात एकाही दुकानात कारवाई झालेली नाही. येथील बहुतांश दुकानदारांनी प्लास्टिक बंदीच्या नियमाला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येते. आज या पथकांनी कारवाई बरोबरच प्लास्टिक वापर टाळा, असे आवाहन करत जनजागृती देखील केली असल्याचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी बोलताना शेवटी सांगितले.





















Join Our Whatsapp Group