पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणारी पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्यासाठी आणि भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पाऊल उचलले आहे. भामा आसखेड धरणातील साचलेला गाळ काढून धरणाची मूळ साठवण क्षमता वाढवण्यात यावी, यासाठी आमदार गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जिल्हा जलसंधारण विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे पत्र पाठवले आहे.

धरणात गाळ साचल्याने पाणी टंचाई..
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी आणि औद्योगिकीकरणासाठी भामा आसखेड धरण हा एक अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे. या धरणातून शहराला दररोज सुमारे १६७ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने धरणाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी, पावसाळ्यात धरण भरूनही प्रत्यक्ष पाणीसाठा कमी होत असल्याने शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

आमदार अमित गोरखे यांचे लेखी निवेदन
शहरातील नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार अमित गोरखे यांनी २० एप्रिल २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले होते. शहराची वाढती औद्योगिक गरज आणि लोकसंख्या पाहता भामा आसखेड धरणातील गाळ काढणे ही काळाची गरज आहे. जर ही कार्यवाही तातडीने झाली नाही, तर भविष्यात पाणी संकट अधिक गंभीर होईल, असा इशारा आमदार अमित गोरखे यांनी दिला आहे.

महापालिकेची सकारात्मक भूमिका:
आमदार गोरखे यांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (३) यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी (मृद व जलसंधारण विभाग, पुणे) यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, आगामी पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेच्या धर्तीवर भामा आसखेडमधील गाळ महिनाभरात काढण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून यंत्रणा कार्यान्वित करावी.
पिंपरी-चिंचवडकरांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. भामा आसखेड धरणातील गाळ काढल्यास धरणाची क्षमता वाढेल आणि पर्यायाने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. महानगरपालिकेने माझ्या पत्राची दखल घेत जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, ही समाधानाची बाब आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा गाळ काढला जावा, यासाठी माझा पाठपुरावा शेवटपर्यंत सुरू राहील, असे आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, जलसंधारण विभाग यावर आता काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group