चिंचवड (Pclive7.com):- शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा अधोरेखित केली.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंगलमय अभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांच्या सहकार्याने पार पडलेल्या रक्तदान शिबिरात युवकांसह अनेक नागरिकांनी उत्साहाने रक्तदान केले. वाढत्या रक्ताच्या गरजेच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.शेळके, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. राजू गुणवंत, प्रमुख सेवेकरी सौ. क्षमा ताई, महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ. सारिका रिकामे तसेच युवा मंचाचे अध्यक्ष चैतन्य बनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.

सर्वांच्या समन्वयातून पार पडलेला हा वर्धापन दिन सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व रक्तदाते व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानण्यात आले.




















Join Our Whatsapp Group