पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसरात कोयत्याच्या धाकावर एका दुकानदाराकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागून दहशत माजवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार उद्धव बाबर आणि सोपान गजानन बुलाखे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपळे सौदागर येथील एका दुकानात घुसून दुकानदाराकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, दुकानदाराने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या आरोपींनी हातात कोयता घेऊन दुकानातील साहित्याची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगवी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि दोन्ही आरोपींना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत दूर करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची भररस्त्यात धिंड काढत कडक संदेश दिला. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून सांगवी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकप्रतिनिधींनी केली होती कडक कारवाईची मागणी
स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपळे सौदागर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी सांगवी पोलिसांची भेट घेऊन या संदर्भात तातडीने कारवाई करत या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.




















Join Our Whatsapp Group