पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका सभा तहकूब करण्याचा विक्रम करणाऱ्या सत्ताधारी भाजपकडून आता स्थायी समिती सभा तहकूब करण्याचा ‘सिलसिला’ सुरू झालायं. आज होणारी स्थायीची बैठक आयुक्त नसल्याने तहकूब केली गेल्याचे स्थायी सदस्यांकडून सांगण्यात आले. पण त्यामागे वेगळेच कारण असल्याची कुजबुज पालिका वर्तुळात सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा तहकूबीचे सत्र सुरू होते. सव्वा वर्षात तब्बल २१ सभा तहकूूब करण्याचा विक्रम सत्ताधाऱ्यांनी केलायं. त्यापाठोपाठ आता स्थायी समितीच्या तहकूबीचा ‘सिलसिला’ सुरू झालयं. गेल्या आठवड्यात देखील स्थायीची बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर आता आयुक्त श्रावण हर्डीकर नसल्यामुळे आजची सभा तहकूब केल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले. मात्र शहरात होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये दुसऱ्या आठवड्यातही एकमत न झाल्याने आजची सभा तहकूब करण्यात आल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बोऱ्हाडेवाडी येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. तो विषय आज स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु, या विषयावर भाजपामधील दोन गटांमध्ये एकमत न झाल्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यातही सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली असल्याचे बोलले जात आहे.