पिंपरी (Pclive7.com):- आषाढीवारी करुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी सव्वा आठ वाजता पिंपरीगावातून देहूकडे मार्गस्थ झाली. यंदा प्रथमच या पालखीने चिंचवडगावात काही वेळासाठी विसावा घेतला. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा भाविकांना प्रथमच अनुभवायला मिळाला.
टाळ-मृदंगाच्या गजरात शहरवासीयांनी पालखीचे जंगी स्वागत केले. चिंचवडच्या गांधी चौकात पालखीने विसावा घेतला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, मंदार देव महाराज तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांचा सत्कार देव महाराजांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे एक शिल्प पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांना भेट देण्यात आले. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या जयघोषाने चिंचवडगाव दुमदुमून गेले. वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊ वाजता पालखी देहूकडे मार्गस्थ झाली.