पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यू आजाराने सध्या डोके वर काढले आहे. १ जूनपासून आत्तापर्यंत ५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ८६३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
शहरामध्ये जून महिना अखेरीस ३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. तर, जुलै महिन्यात गेल्या दोन दिवसांमध्ये नव्याने २ बाधित रुग्ण आढळले आहेत. पिंपळे सौदागर आणि मोशी येथील हे रुग्ण आहेत. ५ बाधित रुग्णांपैकी ४ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
जानेवारी महिन्यापासून डेंग्यू संशयित रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. जानेवारीमध्ये ३११ संशयित रुग्ण होते. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात संशयित रुग्णांची संख्या घटत गेली. मे महिन्यापासून पुन्हा संशयित रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात २२५, जूनमध्ये ७४१ तर, जुलै महिन्यात गेल्या दोन दिवसांमध्ये १२२ संशयित रुग्णांची नोंद झाली. मात्र शहरातील खासगी रूग्णालयांत या आजाराचे किती रूग्ण उपचार घेत आहेत, याविषयी माहिती उपलब्ध होवू शकत नाही.
डेंग्यू आजाराची लक्षणे आढळून येताच नागरिकांनी नजीकच्या महापालिका रुग्णालयातून औषधोपचार व सल्ला घ्यावा. डेंग्यू तापाच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह धरू नये.– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.