पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना भरतीची एक संधी मिळावी, याबाबत पोलिस भरती निवड मंडळाने निर्णय घेतला आहे. जे उमेदवार मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिले आहेत आणि ज्यांनी तारीख वाढवून घेतलेली नाही, अशा उमेदवारांची मैदानी चाचणी १० जुलै रोजी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात २६२ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे ही भरती १९ जून ते १० जुलै या कालावधीत होत आहे. २६२ जागांसाठी १५ हजार ४२ अर्ज आले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा असल्याने २५ ते ३० जून या कालावधीत भरती प्रक्रिया स्थगित केली होती. १ जुलैपासून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, काही उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले असल्याने त्यांना एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली आहे. असे उमेदवार मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिले.
मात्र, त्यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांना दुसरी तारीख दिली. तसेच जे उमेदवार गैरहजर आहेत व त्यांनी यापूर्वी शारीरिक चाचणीसाठी तारीख वाढवून घेतलेली नाही, अशा गैरहजर उमेदवारांना एक संधी उपलब्ध करून देण्याबाबत पोलिस भरती समितीने निर्णय घेतला आहे. शारीरिक चाचणीसाठी तारीख वाढवून न घेतलेल्या उमेदवारांनी १० जुलै रोजी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर भोसरी येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group