पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करू नये अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केली आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपयुक्त ममता शिंदे यांना त्यांनी निवेदन दिले असून शासन निर्देशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

ऐश्वर्या तरस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांवर गणवेश, वह्या, पुस्तके, बूट, दप्तर तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश निर्गमित केलेले आहेत.

परंतू पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही खाजगी शाळांकडून पालकांना विशिष्ट दुकान अथवा पुरवठादारांकडूनच साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. यामुळे पालकांची आर्थिक पिळवणूक होत असून शासनाच्या आदेशांचे उल्लंघन होत आहे.

तसेच राज्य मंडळ, CBSE, ICSE तसेच इतर मंडळांच्या शाळांनी संबंधित मंडळांनी मान्यता दिलेली पाठ्यपुस्तकेच वापरावीत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके सक्तीने विकत घेण्यास भाग पाडू नये अशी मागणी ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना तात्काळ परिपत्रक / सूचना पत्र जारी करून खालील बाबींची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.
१) कोणत्याही शाळेने गणवेश, पुस्तके, वह्या, बूट, दप्तर इत्यादी साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करू नये.
२) पालकांना खुल्या बाजारातून दर्जेदार व परवडणाऱ्या दरात साहित्य खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध राहावा.
३) शाळांकडून विशिष्ट प्रकाशनांची पुस्तके सक्तीने घेण्यास भाग पाडू नये.
४) या संदर्भातील तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी.
५) जे शाळा प्रशासन दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.



















Join Our Whatsapp Group