
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ड’ प्रभागातील विविध नागरी प्रश्न, मूलभूत सुविधा आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नुकतीच आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, प्रलंबित कामे तसेच आगामी विकास आराखड्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

ही बैठक सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, तसेच प्रभागातील सर्व नवनिर्वाचित नगरसेविका आणि नगरसेवक उपस्थित होते. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्याच्या दृष्टीने प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे विविध विषयांवर चर्चा केली.

बैठकीत कचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा, उद्यानांची देखभाल, रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाइट व्यवस्था, ड्रेनेज लाइन, स्ट्रॉम वॉटर लाइन तसेच नाल्यांची साफसफाई या महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. अनेक भागांमध्ये नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्याचे नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी सांगितले.

प्रभागातील समस्या केवळ नोंदवून न ठेवता त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश प्रशांत शितोळे यांनी यावेळी दिले.

या बैठकीला उपस्थित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या मांडत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे प्रभागातील कचरा, पाणी, सांडपाणी, नाले सफाई, आरोग्य, रस्ते, पथदिवे, पदपथ, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी यांसारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रशासन प्रयत्न करील अशी आम्हास अपेक्षा आहे.– स्नेहा रणजित कलाटे, नगरसेविका



















Join Our Whatsapp Group