पिंपरी (Pclive7.com):- अहमदनगर येथील गुन्हेगार मध्य प्रदेशमधील सीमा भागात जाऊन तिथल्या स्थानिकांना हाताशी धरून तिथून पिस्तूल खरेदी करून आणत असे. तिथून आणलेले पिस्तूल महाराष्ट्रभर फिरून गुन्हेगारांना विकत असे. या पिस्तूल विक्रेत्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराला देखील अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त केली.
दुर्गेश बापू शिंदे (३७, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या पिस्तूल विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्यासह प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (३२, रा. राजगुरूनगर, ता. खेड. मूळ रा. वाळद, ता. खेड, पुणे) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिस्तूल विक्रीसाठी एकजण चिंचवड गावात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता संशयित दुर्गेश शिंदे याला पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. दुर्गेश याचा साथीदार प्रवीण ओव्हाळ याला खेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
दुर्गेश हा मध्य प्रदेशमधील सीमा भागात जाऊन स्थानिक लोकांना हाताशी धरून तिथून देशी बनावटीची पिस्तूल खरेदी करतो. ते पिस्तूल महाराष्ट्रभर फिरून इथल्या गुन्हेगारांना दुप्पट किमतीने विकायचा.