पिंपरी (Pclive7.com):- प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपीला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अखेर अंबाजोगाई, बीड व आंध्र प्रदेश तिरुपती येथे पाठलाग करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०८ एप्रिल २०२६ रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी राम कजेवाड हा फरार होता. तपासादरम्यान समोर आले की, आरोपीचे महिला आरोपी बरसिन महबूब शेख (वय २७) हिच्याशी प्रेमसंबंध होते. संबंधित महिला आरोपी विवाहित असून तिचा आलेत हा सहा वर्षांचा मुलगा होता.

सदर मुलगा हा त्यांच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने आरोपी आणि महिलेने मिळून कट रचला. दिनांक ०४ एप्रिल रोजी दुपारी आवेजला बाथरुम मधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवुन आणि त्याचे डोके भिंतीवर व जमीनीवर आपटुन त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. हत्येनंतर गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्युचे स्वरुप देण्यासाठी आवेजचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याच्या बनाव केला. आवेजचा मृतदेह आरोपी राम कजेवाड याचे इर्टिगा कारमधुन धर्मापुरी ता. परळी जि. बीड घेउन गेले असता, यातील फिर्यादी इसाक शेख यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे यांना माहीती दिली.

सदर बाबत मयत मुलाचे डोक्यावर व पाठीवर मारहाणीचे जखम दिसुन आल्याने व तिचे संशयास्पद हालचालीमुळे व शवविच्छेदन अहवालामुळे महिला आरोपी बसरिन शेख हिचेकडे सखोल चौकशी केली असता, तिने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन येथे फिर्यादी इसाक शेख रा. बीड यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन या प्रकरणी मयत मुलाची आई बसरिन शेख हिला यापुर्वीच अटक करण्यात आली होती. तिचा प्रियकर राम कजेवाड हा फरार होता. तो तिरुपती, आंध्रप्रदेश व अंबाजोगाई जि. बीड येथे पाठलाग करुन त्याचा शोध घेऊन त्याला दि.१७ रोजी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुल्ली, सहायक पोलीस फौजदार चौधरी, अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड केली असुन सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे करीत आहेत.



















Join Our Whatsapp Group