पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (PCSCL) व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे-सौदागर व पिंपळे गुरव येथे “सार्वजनिक सायकल सुविधा” (public bicycle sharing) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. रविवार दि. २६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र झूमकार कम्पनीने दि.२३ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘स्मार्ट सायकल शेरिंग सेवा’, पीईडीएल ‘या नावाने सेवा चालू केला होती. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेविका शितल काटे व पिंपळे-सौदागर परिसरातील १५ सोसायटीतील पदाधिकारी यांच्या हस्ते झाले होते. असे असताना जुन्या सेवेला नव्याने प्रकल्प राबविण्याचा घाट पिंपरी चिंचवड सत्ताधारी भाजपकडून केला जात असल्याचा आरोप नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, पर्यावरण व आरोग्याला अनुकूल अशी सेवा पिंपळे सौदागर परिसरातील १५ पेक्षा अधिक सोसायटीत मागील वर्षी झूमकार कम्पनीने ‘स्मार्ट सायकल शेरिंग सेवा’, पीईडीएल ‘या नावाने प्रकल्प राबविला होता. यात सायकलसाठी तासाला २/- प्रमाणे ‘पीईडीएल’च्या समर्पित’ स्टेशन्स ‘वरून नागरिक सायकल वापर करत होते. त्यामुळे परिसरात फिरण्यासाठी व कमी प्रदूषण, कमी ट्रॅफिक जाम आणि सर्वात महत्वाचे चांगले जीवन दायी असा प्रकल्प सुरु होता. मात्र पालिकेच्या वतीने सर्व परिसरातील सायकली काढून घेतल्या आणि काही कालावधीनंतर १० रु प्रति तास दराने हाच प्रकल्प पुन्हा रिलॉन्च होत आहे. या प्रकरणात जास्त दराने व जुनाच प्रकल्प पुन्हा राबविण्यात सत्ताधारी भाजपकडून ‘स्मार्ट कामापेंक्षा’ ‘स्मार्ट प्रसिद्धीचा’ खटाटोप जास्त होताना दिसत असल्याचे नाना काटे यांना दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.