पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत दीड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपात गटबाजी काही नवीन नाही. शहराध्यक्ष लक्ष्मण जागताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील सत्तासंघर्ष तर जगजाहीर आहे. हा वाद सुरू असताना आता सत्ताधारी भाजपातील नगरसेवकांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पिंपळे निलख-वाकड प्रभागातील येथील एकाच कामाचे उद्घाटन दोनवेळा करण्याचा प्रताप या मंडळींनी केला आहे.
पिंपळे निलख-वाकड प्रभाग क्रमांक २६ मधील नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याच्या कामाचे त्याच प्रभागातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी चक्क दोन वेळा उद्घाटन केले आहे. पिंपळे निलखमधील डायनँस्टी सोसायटी शेजारील १ कोटी ३७ लाखाच्या या कामाचे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्धाटन होणार होते. मात्र लक्ष्मण जगताप हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे स्थायी सभापती ममता गायकवाड आणि त्यांचे पती विनय गायकवाड यांनी घाईघाईत या कामाचे उद्धाटन (शनिवार दि.२९ रोजी) उरकून घेतले. या उद्धाटनाची कोणतीच कल्पना गायकवाड यांनी स्वपक्षिय भाजपच्या स्थानिक नगरसेवकांना दिली नाही. त्यामुळेच नाराज झालेले भाजपाचे नगरसेवक संदीप कस्पटे यांनी आज (रविवार दि.३० रोजी) तातडीने पुन्हा त्याच कामाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी स्थानिक नगरसेविका आरती चोंधे, तुषार कामठे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
एकाच प्रभागातील एकाच पक्षातील नगरसेवकांमध्ये होत असलेले कुरघोडीचे राजकारण या उद्धाटनावरून चव्हाट्यावर आले आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप सध्या परदेशात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आल्यामुळे येत्या काळात भाजपातील संघर्ष चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.