पिंपरी (Pclive7.com):- स्वाईन फ्लू सारख्या भयानक आजाराने मृत्युमुखी पडलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांच्या कुटूंबियांना महापालिकेने प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी केली आहे.
संजय गायके यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात आपल्या व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या चुकीमुळे स्वाईन फ्लुचे प्रमाण वाढुन अनेक गरीब नागरीकांचे प्राण गेले आहेत. त्यांच्या कुटूंबियांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या परिवाराची आपला माणुसही गेला आणि पैसाही गेला, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. काहींनी तर महापालिकेच्या रूग्णालयावर विश्वास नसल्यामुळे खाजगी दवाखान्यात कर्ज काढुन उपचार घेतले आहेत. तेथे पण त्याच्या हाती पेशंट लागला नाही.
शहरातील सर्व नागरीक वेळेत कर भरतात. त्यांच्या आरोग्याची सोय वेळेतच केली गेली पाहीजे. नागरीक आत्ता गप्प बसणार नाहीत, तुमच्या गाडया अडवतील, तुमच्या घरावर धडक मारतील, नागरीक फार भडकले आहेत. तुमचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी फुकटचा पगार घेवुन फार मुजोर झाले आहेत. ते फक्त पगारा पुरते काम करत आहेत. त्यांना नागरीकांचे काही घेणे देणे नाही.
म्हणूनच शहरात स्वाईन फ्लूने जे नागरिक मरण पावले आहेत, त्यांच्या प्रत्येक कुटूंबियांना महापालिकेच्या वतीने ५ लाखाची मदत केली गेली पाहीजे, अशी मागणी संजय गायके यांनी आयुक्तांकडे केली आहे.