पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लेखापरीक्षणातून तब्बल ६ हजार २५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार व गैरकारभाराचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. याबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांत कठोर कारवाई करावी, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

भापकर यांनी महापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, महापालिकेच्या अंतर्गत व विशेष लेखापरीक्षणात प्रचंड आर्थिक अनियमितता आढळून आली असून त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

मुख्य लेखापरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सन १९८२-८३ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रलंबित आक्षेप, वसूलपात्र रक्कम आणि तपासणीअभावी आक्षेपाधीन रक्कम मिळून सुमारे ६ हजार २३४ कोटी रुपयांची रक्कम वादग्रस्त आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या विशेष लेखापरीक्षणात आणखी २२ कोटी रुपयांचा मुद्दा समोर आला आहे. अशा प्रकारे एकूण ६ हजार २५७ कोटी १ लाख ५८ हजार ८५ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मारूती भापकर यांनी म्हटले आहे की, लेखापरीक्षण विभागावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतो, मात्र आढळलेल्या अनियमिततेवर वेळेत कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाने दोन महिन्यांच्या आत ठोस पावले उचलावीत, अन्यथा पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags: maruti bhapkar






















Join Our Whatsapp Group