पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मुळा नदीवर सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारलेल्या पुलाच्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भापकर यांनी केली आहे.

मारूती भापकर यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित पुलासाठी सन २०२२ मध्ये सुमारे ३२ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, काम पूर्ण होण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली तसेच खर्चातही वाढ करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, या पुलाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल २१ कोटी ८७ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. विशेष म्हणजे, पुलाचे उद्घाटन २०२४ मध्ये करण्यात आले होते, तर सुशोभीकरणाचे उद्घाटन नुकतेच ७ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले.
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आणि ठेकेदारांची बिले प्रलंबित असताना अशा कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भापकर यांनी या संपूर्ण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, मंजूर दर, अटी-शर्ती, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी, मोजमाप पुस्तिका तसेच बिलांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

तसेच, सुशोभीकरणाच्या कामात वापरण्यात आलेले साहित्य, त्याचे बाजारभाव आणि प्रत्यक्ष खर्च यांचीही तपासणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची तज्ञ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अपहार झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.



















Join Our Whatsapp Group