पिंपरी (Pclive7.com):- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मावळ आणि खेड तालुक्यांमध्ये केलेल्या कारवायांमध्ये २ लाख २३ हजार १९६ रुपये किमतीचा भेसळयुक्त मँगो पल्प आणि त्यासाठी वापरले जाणारे हानिकारक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथकाने मावळ तालुक्यातील उर्से येथील मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम या आस्थापनेवर छापा टाकला. या ठिकाणी कोणताही परवाना नसताना आणि धोकादायक रंग व इतर पदार्थांचा वापर करून मँगो पल्प तयार केला जात असल्याचे उघड झाले. तपासणी दरम्यान मँगो पल्प, मँगो फ्रूट आणि पल्प तयार करण्यासाठी वापरली जाणारी साखर, गायीचे दूध व केशर कलर लिक्वीड सोल्युशन यांसारखे भेसळकारी पदार्थ आढळून आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने या पदार्थांचे सहा नमुने तपासणीसाठी घेतले. उर्वरित एक लाख ६१ हजार ८१६ रुपये किमतीचा ३२८२.९ किलो साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

मावळमधील उत्पादकाने हा साठा खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील अविष्कार एन्टरप्रायझेसला पुरवल्याचे तपासात समोर आले. प्रशासनाने तातडीने या ठिकाणचीही तपासणी केली आणि तेथून ६१ हजार ३८० रुपये किमतीचा ५५८ किलो मँगो पल्प जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील आणि सह आयुक्त डी. व्ही. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एन आर सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी बी. ए. शिंदे, एस. डी. मस्के, पी. एस. कच्छवे, सतिश हाके यांनी केली.

उन्हाळी मोहिमेदरम्यान विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये भेसळीचा संशय आल्यास नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी. कोणत्याही फळ विक्री किंवा ज्युस उत्पादकांनी विना परवाना व्यवसाय करू नये. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नुसार विना परवाना व्यवसाय केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.– डी. व्ही. भोगावडे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे.




















Join Our Whatsapp Group