पिंपरी (Pclive7.com):- भोसरीत सध्या दादाची ‘दादागिरी’ सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या दावणीला बांधले गेलेत. सत्ताधाऱ्यांचे ते घरगडी झालेत. यापूर्वीचा खाजगी तत्त्वावर रूग्णालय देण्याचा अनुभव क्लेशदायक असताना, भोसरीचे प्रस्तावित रुग्णालय खाजगी तत्वावर चालविणेस देण्याचा अट्टाहास केला जात आहे. स्थानिक आमदारांना या माध्यमातून त्यांचे नविन दुकान चालू करण्याचा ‘डाव’ आहे. हे रूग्णालय महापालिकेमार्फतच चालवले जावे. खाजगी तत्वावर रूग्णालय चालविण्यास देण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. याप्रकरणी साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे.
विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत भोसरी येथे नव्याने उभारणी होत असलेले सुसज्ज रुग्णालय खाजगी संस्थेमार्फत चालविण्याचा ‘उद्योग’ सुरू आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयांमध्ये शहरातीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. शहरामध्ये वायसीएम रुगणालयसह, तालेरा, जिजामाता,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,भोसरी,आकुर्डी,यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील, इत्यादी रुग्णालये सद्यस्थितीत कार्यरत असून ती समाधानकारक वैद्यकीय सुविधा शहरातील नागरीकांना पुरवित आहेत. ही सर्व रुग्णालये पालिकेमार्फत चालविली जात आहेत. तर दुसरीकडे वायसीएम मधील रुबी अल केअर हे मनपाचे रुग्णालय खाजगी संस्थेस चालविण्यास दिले आहे. परंतु रूबीचा अनुभव ‘क्लेशदायक’ आहे. तरी सुध्दा भोसरीचे प्रस्तावित रुग्णालय खाजगी तत्वावर चालविणेस देण्याचा अट्टाहास केला जात आहे. उद्या अपुरे मनुष्यबळ आहे म्हणून महापालिका देखील खाजगी तत्वावर चालविण्यास देण्याचा ठराव देखील होऊ शकतो. स्थानिक आमदारांना या माध्यमातून त्यांना त्यांचे नविन दुकान चालू करावयाचे आहे. त्यांच्याचदबावाखाली हा निर्णय घेतला जात आहे. आयुक्त त्याला नेहमीप्रमाणे संमती देऊन ते भाजपचे ‘ब्रँड अँम्बेसिटर’ असल्याचे परत एकदा सिध्द करणारका? असा सवाल दत्ता साने यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील जनतेच्या आरोग्य वैद्यकीय सुविधेशी खेळाचा प्रयत्न न करता भोसरी येथील रुग्णालय खाजगी तत्वावर न देता पालिकेमार्फत चालविण्यास यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील नागरीकांसह तीव्र आंदोलन करणार आहे. तसेच याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचेही दत्ता साने यांनी शेवटी बोलताना सांगितले.























Join Our Whatsapp Group