पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत संभाजीनगर येथील सार्वजनिक उद्यानात सुरू असलेले वादग्रस्त अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक ११ मधील सार्वजनिक उद्यानात राजकीय आश्रयातून १०० हून अधिक डेरेदार झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. त्यानंतर दोन गुंठ्यांहून अधिक जागेवर समाजमंदिर उभारण्याच्या नावाखाली सिमेंट-काँक्रीटचे अनधिकृत बांधकाम वेगाने सुरू करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि अतिक्रमण सुरू असतानाही महापालिकेच्या उद्यान व स्थापत्य विभागातील वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

या प्रकरणी प्रभाग ११ मधील नगरसेवकांनी सजग नागरिकांसह महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडून संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.

नागरिकांचा वाढता रोष आणि आंदोलनाचा इशारा लक्षात घेऊन अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तत्काळ कारवाई करत बुलडोझरच्या सहाय्याने उद्यानातील संपूर्ण अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. दरम्यान, या कारवाईनंतर आता संबंधित दोषींवर वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group