पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक भागांतील नागरिकांना पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नाममात्र दरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या श्रुती राम वाकडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहराचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून लोकसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असून त्यासाठी दरमहा लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.

यामध्ये एक बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे की, खासगी टँकर चालकांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असून ते संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी असल्याने, महानगरपालिकेनेही आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर टँकर उपलब्ध करून नागरिकांना खाजगी टँकरपेक्षा नाममात्र दरात पाणीपुरवठा करावा, अशी ठाम मागणी श्रुती वाकडकर यांनी केली आहे.
शहरातील पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत महानगरपालिकेने विशेष उपाययोजना राबवून टंचाईग्रस्त भागांमध्ये सवलतीच्या दरात टँकरने पाणी उपलब्ध करून द्यावे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. महानगरपालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




















Join Our Whatsapp Group