पिंपरी (Pclive7.com):- पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) नाराजी उफाळून आली आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षाच्या उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करत विक्रम काकडे यांना आर्थिक निकषांच्या आधारे उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लांडे म्हणाले की, “पक्षातील अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराला संधी देण्यात आली. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारा आहे.” यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करत, “आज अजितदादा असते तर त्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्याचा विचार केला असता. त्यांच्या पश्चात आम्ही हतबल झालो आहोत,” अशी खंत व्यक्त केली.

विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर उपरोधिक भाष्य करताना लांडे म्हणाले, “पक्षाने त्यांना संधी दिली आहे, त्यामुळे भविष्यात पक्षाची ताकद नक्कीच वाढेल,” असा टोला त्यांनी लगावला.
विशेष म्हणजे, विलास लांडे यांचा आज वाढदिवस असून विधान परिषद उमेदवारीच्या निमित्ताने पक्षाकडून ‘बर्थडे गिफ्ट’ मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.




















Join Our Whatsapp Group