मृतांच्या वारसांच्या खात्यात महापालिकेकडून आर्थिक मदत जमा करण्यास प्रारंभ
पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले. त्यानुसार तातडीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मृत अक्षय सावंत (वय ३२) यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या खात्यात १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

१० लाख रुपयांच्या या मदतीपैकी मृत अक्षय सावंत यांच्या पत्नी हर्षदा सावंत यांच्या खात्यात ३४ टक्के, तर आई रेश्मा सावंत आणि वडील राजू सावंत यांच्या खात्यात प्रत्येकी ३३ टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच मृत भावेश वाणी (वय ३३), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी), राहुल गायकवाड (वय २३, मोशी) तसेच वामन कसबे (वय ५०, मोशी) यांच्या कुटुंबीयांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू असून, ती पूर्ण होताच याच पद्धतीने त्यांच्या खात्यातही आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जलद गतीने सुरू असून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच ही मदत त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. बाधित कुटुंबांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. याचबरोबर शहरातील सर्व वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पांतील सुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने राबविण्यात येत आहेत.– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.






















Join Our Whatsapp Group