पिंपरी (Pclive7.com):- अँटी करप्शन ब्युरो (एसीबी), पुणे यांनी दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट (वय ३५) यांना ३ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पीएसआय गपाट यांच्याकडे होता. हा गुन्हा ‘बी’ फायनल करण्यासाठी तसेच भविष्यात मदत करण्याच्या मोबदल्यात त्यांनी सुरुवातीला ८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर १५ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत तडजोडीनंतर ३ लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीने सापळा रचला. १५ जुलै रोजी सायंकाळी ५.४९ वाजता दिघी पोलीस ठाण्यात पीएसआय चैताली गपाट यांनी तक्रारदाराकडून ३ लाखांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताच एसीबीने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाई पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी केली असून तपास पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे करत आहेत.





















Join Our Whatsapp Group