पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरासह मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. काही सोसायट्यांच्या आवारात आणि बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याच्या घटनांवरून नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर टीका करत संबंधित बिल्डरांवर कठोर कारवाईची मागणी केली.

सभागृहात बोलताना राहुल कलाटे यांनी शहरातील अनेक भागांतील पूरस्थिती ही केवळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप केला. शहरातील विकासकामे आणि बांधकामांच्या प्रक्रियेत नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बुजविणे, जलनिस्सारण मार्गांवर अतिक्रमणे करणे आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे पावसाचे पाणी अडून राहते. परिणामी सोसायट्या, रस्ते आणि बेसमेंटमध्ये पाणी साचण्याच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात पुरेसे पंप उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी तातडीची मदत पोहोचविण्यात अडचणी आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देताना अधिकारी तत्परता दाखवतात, मात्र प्रत्यक्ष जागेची पाहणी आणि मूलभूत सुविधांची पडताळणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

वाकडमधील विनोदे वस्ती, ताथवडे येथील ‘41 Elite Krishala’ आणि पुनावळ्यातील सियोना पेठकर सोसायटी यांसह विविध ठिकाणी झालेल्या पाणी साचण्याच्या घटनांचा सखोल अभ्यास करून ज्या ठिकाणी बांधकामातील त्रुटी, नाले बुजविणे किंवा नियोजनातील निष्काळजीपणा आढळेल, त्या प्रकरणांमध्ये संबंधित बिल्डरांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कलाटे यांनी केली. एखाद्या सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरण्यामागे बांधकामातील दोष किंवा अपुरी जलनिस्सारण व्यवस्था कारणीभूत असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बिल्डरवर निश्चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील संवेदनशील आणि पूरग्रस्त ठिकाणांची तातडीने पाहणी करून संभाव्य धोक्यांची माहिती घ्यावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.
महापालिका प्रशासन, संबंधित बिल्डर आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्यांवर कायमस्वरूपी आणि व्यवहार्य तोडगा काढण्याची गरज असल्याचे सांगत, “आज जे घडले ते उद्या पुन्हा घडू नये. शहराच्या विकासाबरोबर नागरिकांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. जबाबदारी निश्चित झाली तरच भविष्यात अशा निष्काळजीपणाला आळा बसेल,” असे राहुल कलाटे यांनी ठामपणे सांगितले.





















Join Our Whatsapp Group