पिंपरी (Pclive7.com):- रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे सवलत व बैठक व्यवस्था मिळावी, या प्रमुख मागणीसाठी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज (दि.१५) आकुर्डी रेल्वे स्थानकावरील मुख्य तिकीट बुकिंग कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात ११० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कोविडपूर्व काळात ६० वर्षांवरील पुरुष आणि ५८ वर्षांवरील महिलांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत तसेच विशेष बैठक व्यवस्था उपलब्ध होती. मात्र, २०२० पासून ही सुविधा बंद करण्यात आली आहे. ती तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

या उपोषणाला ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष विजय सिनकर, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे, सरिता साने, निलेश शिंदे, अरुण थोरात, उद्योजक अतुल इनामदार, सलीम शिकलगार तसेच डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी नैतिक पाठिंबा देत आपली मनोगते व्यक्त केली.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर व नागरी समस्या निवारण समितीचे प्रमुख आर. एस. कुमार यांच्या अथक प्रयत्नांतून आणि संघाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वीपणे पार पडले.

यावेळी आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या मुख्य बुकिंग सुपरवायझर जया यादव आणि शिवाजीनगर परिक्षेत्राचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आशिष दत्त यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी उपोषण मागे घेतले.

या आंदोलनास संघाचे माजी पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून सवलतीची योजना पूर्ववत लागू करावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.





















Join Our Whatsapp Group