पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या बनली असून, ती कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आता प्रत्येक प्रभागात कचरा वर्गीकरण केंद्र उभारून प्रभागनिहाय जबाबदारी निश्चित करावी, अशी भूमिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या सभागृहात मांडली. या संदर्भात कुठलेही राजकारण न होता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येवून पुढाकार घेत कचऱ्याची समस्या मार्गी लावावी, असेही त्यांनी नमूद केले.

कचरा व्यवस्थापनासाठी प्रभागस्तरीय नियोजन..
शहरातील कचरा समस्या मुळापासून संपवण्यासाठी महापालिकेने आता विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारले पाहिजे. याबद्दल अधिक माहिती देताना अभिषेक बारणे यांनी सांगितले की, शहराचा कचरा प्रश्न सुटण्यासाठी प्रत्येक प्रभागाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. या नव्या नियोजनानुसार, प्रत्येक प्रभागामध्ये कचरा विलगीकरण आणि वर्गीकरणाचे स्वतंत्र केंद्र कार्यान्वित केले जावे. यामुळे ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती किंवा पुनर्वापर करणे सोपे होईल. हे काम प्रत्यक्ष जमिनीवर अंमलात यावे, यासाठी संबंधित एजन्सी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दुर्दैवी दुर्घटनेतील बाधितांना मोठा आधार..
कचरा व्यवस्थापनासोबतच, मोशी येथील कचरा डेपो येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णयही सभापती बारणे यांनी जाहीर केला. यात मृत व्यक्तींच्या प्रत्येक वारसाला महापालिकेच्या वतीने १० लाख रुपये, तर संबंधित संस्थांकडून २५ लाख रुपयांची आणि शासनाकडून 5 लाखाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, जखमींच्या उपचारासाठी आणि त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी महापालिका सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट करून ही प्रक्रिया त्वरित राबवावी, असे त्यांनी सांगितले.

या संकटकाळात महापालिका आयुक्त, एनडीआरएफ (NDRF), लष्करी जवान (मिलिटरी) आणि मनपा अग्निशामक दलाने दाखवलेल्या तत्परतेचे सभापती अभिषेक बारणे यांनी विशेष कौतुक केले. या बचाव पथकांनी जीवाची बाजी लावून केलेल्या कामगिरीमुळेच अनेकांचे प्राण वाचले, असे सांगत त्यांनी या सर्व जवानांच्या धैर्याला सलाम केला.

आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘विशेष कृती आराखडा..
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील ३२ प्रभागांमध्ये महापालिकेच्या ८ ते ९ हजार कर्मचाऱ्यांची विभागणी करून त्यांना आपत्कालीन कामासाठी प्रशिक्षित केले जावे. तसेच, नदीपात्र आणि नाले लगतच्या धोकादायक ठिकाणांची पाहणी करून तिथे सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईनची साफसफाई आणि वृक्षछाटणी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मदत वाटपात पारदर्शकता आणि तत्परता..
मदत वाटपाच्या प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व ठराव तातडीने मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासह शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group