पिंपरी (Pclive7.com):- घरकुल परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज घरकुल परिसरातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच भाजी मंडई धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोर्चाचे नेतृत्व मारुती गणपत जाधव यांनी केले. यावेळी महापालिका प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. घरकुल परिसरातील गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध नागरी समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

नागरिकांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये एसटीपीचे दूषित पाणी घरकुल परिसरात येणे बंद करणे, अनेक वर्षांपासून बंद असलेली भाजी मंडई सुरू करणे, अपूर्ण सांस्कृतिक भवन नागरिकांसाठी खुले करणे, व्यायामशाळा सुरू करणे, अंगणवाडी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, मुख्य प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, स्टॉर्म वॉटर लाईनची नियमित स्वच्छता व दुरुस्ती करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे तसेच घरकुल परिसरासाठी विशेष विकास कृती आराखडा जाहीर करणे यांचा समावेश होता.

या मोर्चा दरम्यान काँग्रेसचे नेते सोमनाथ शेळके, सुग्रीव पाटील, सुरेश वैरागर, रमेश शिंदे, संजय तळेकरी, सुरज देशमाने, दत्तात्रय डोके, तानाजी हावळे, संदीप रोकडे, दीपक कांबळे, सुधाकर कदम, संग्राम पवार, नानासाहेब वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महापालिकेने निश्चित कालमर्यादेत ठोस निर्णय घेऊन विकासकामे सुरू न केल्यास यापेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले.





















Join Our Whatsapp Group