पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मोठी कारवाई केली आहे. १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर एकूण ४ लाख १ हजार ५७० कारवाया करण्यात आल्या असून त्यातून ४० कोटी ८३ लाख २९ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम राबविली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रमुख कारवाया खालील प्रमाणे..
विना हेल्मेट वाहनचालकांवर सर्वाधिक ३०,८२५ कारवाया; दंड ३ कोटी ७ लाख ७९ हजार रुपये.
मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या १२,३३४ चालकांवर कारवाई; दंड १ कोटी ८८ लाख ०८ हजार रुपये.
सिग्नल जंप करणाऱ्या ५४,३३८ वाहनचालकांकडून ४ कोटी ३६ लाख ३२ हजार ५०० रुपये दंड.
ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४०,४१९ दुचाकीस्वारांवर कारवाई; दंड ४ कोटी १२ लाख ५२ हजार रुपये.
विना परवाना वाहन चालविणाऱ्या ५,९५९ जणांवर कारवाई; दंड २ कोटी ७४ लाख ७० हजार रुपये.
फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ३८,४१२ वाहनांवर कारवाई; दंड ३ कोटी १८ लाख ९० हजार रुपये.
याशिवाय काळी काच, मॉडिफाइड सायलेन्सर, रिक्षा नियमभंग, चुकीचे पार्किंग, वाहतूककोंडी निर्माण करणे आदी प्रकारांवरही मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नागरिकांना आवाहन..
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमभंगामुळे होणारे अपघात व वाहतूककोंडी टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर, सिग्नलचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच वाहतूक विषयक तक्रारी किंवा समस्या असल्यास नागरिकांनी वाहतूक हेल्पलाईन क्रमांक 8788649885 वर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group