पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव गावठाण परिसरात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मटका जुगाराचे आकडे स्वीकारून ते पुढे पाठविणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हनुमान मंदिरासमोरील थेरगाव गावठाण तालीम परिसरात करण्यात आली.

आकाश हुसेन वाजंत्री (वय २९, रा. थेरगाव, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पिंटू सोनार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हा या प्रकरणात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘कल्याण’, ‘मिलन’, ‘राजधानी’ आणि ‘टाईम’ या नावाने चालणाऱ्या मटका जुगाराचे आकडे इतर व्यक्तींकडून व्हॉट्सॲप मेसेजद्वारे स्वीकारत होता. हे आकडे तो पुढे पिंटू सोनार याला व्हॉट्सॲपद्वारे पाठवत असल्याचा आरोप आहे.

कारवाईदरम्यान आरोपी मटका जुगार खेळताना आढळून आला. त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आकाश वाजंत्री याला बीएनएसएस कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group