पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या प्रकल्पाची नगरसेवकांच्या उपस्थितीत अधिकृत पाहणी दौरा आयोजित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नवीन प्रशासकीय इमारत लवकरच पूर्णत्वास जाणार असून भविष्यात महानगरपालिकेचे विविध प्रशासकीय कामकाज अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रभावी पद्धतीने पार पाडण्यासाठी ही इमारत महत्त्वाची ठरणार आहे. या इमारतीमध्ये नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, आधुनिक कार्यालयीन व्यवस्था, बैठक कक्ष, तांत्रिक सुविधा, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा आणि इतर अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे त्याच्या कामाची गुणवत्ता, नियोजन आणि उपलब्ध सुविधांची लोकप्रतिनिधींमार्फत प्रत्यक्ष पाहणी होणे आवश्यक असल्याचे काटे यांनी नमूद केले आहे. नगरसेवक हे आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना प्रकल्पाची प्रत्यक्ष माहिती मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान कामाच्या अंतिम स्वरूपाबाबत आवश्यक सूचना, सुधारणा आणि नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त बाबींवर चर्चा होऊ शकते. तसेच उर्वरित कामांमध्ये अधिक पारदर्शकता, गुणवत्ता आणि गती निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, नवीन प्रशासकीय इमारतीचा अधिकृत पाहणी दौरा लवकरात लवकर आयोजित करून नगरसेवकांना प्रत्यक्ष पाहणीची संधी द्यावी, अशी मागणी नगरसेविका अनिता काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group