पिंपरी (Pclive7.com):- गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत निकृष्ट रस्ते कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मारूती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील डांबर उखडले असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मोरवाडी ते चिंचवड स्टेशन दरम्यानच्या सेवा रस्त्यावर तसेच भुयारी मार्गात “रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत वाढ होत असून अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे.

शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भक्ती-शक्ती चौक, रावेत, मुकाई चौक, स्पाईन रोड, मोशी, जाधववाडी, कृष्णानगर, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली आणि आकुर्डी परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच रावेत-औंध बीआरटी मार्ग आणि नाशिक फाटा ते संत तुकारामनगर मेट्रो स्थानकादरम्यानच्या रस्त्यांचीही अवस्था अत्यंत खराब झाल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्यांची नव्याने झालेली कामेही पावसात वाहून गेली असून यामागे अधिकारी, ठेकेदार, सल्लागार आणि संबंधित घटकांच्या संगनमतातून झालेला भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे. संबंधित ठेकेदारांकडून करारातील अटींनुसार पुन्हा दुरुस्ती करून घेण्यात यावी, तसेच शहरभर खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group