पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या संघटन विस्तार मोहिमेला आणखी बळ देत आकुर्डी येथे नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी बोलताना खासदार बारणे यांनी शिवसेना शाखा ही सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रभावी केंद्र असल्याचे सांगितले. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून विकासकामांना गती देणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना तत्परतेने न्याय मिळवून देणे ही शिवसेना शाखांची प्रमुख जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेनेची विचारधारा तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना पक्षाशी अधिक सुलभ संपर्क साधता येईल तसेच त्यांच्या विविध समस्या आणि मागण्या सोडविण्यासाठी शाखा सदैव कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

या शाखा उद्घाटन सोहळ्यास शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे, जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, महानगरप्रमुख राजेश फलके, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, युवती सेना शहरप्रमुख श्वेता कापसे, पिंपरी विधानसभा प्रमुख चेतन बेंद्रे, के. के. काळे, निखिल येवले, महेश काटे तसेच सुनील कानसकर यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या शाखेच्या उद्घाटनामुळे आकुर्डी परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळणार असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





















Join Our Whatsapp Group